(गणपतीपुळे / वैभव पवार)
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात मोहिमेची उद्दिष्टे, पोलिओ लसीकरणाची कार्यपद्धती, लाभार्थी बालकांची नोंदणी, तसेच घरभेटीदरम्यान घ्यावयाची आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषीकेश डोके, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. बारिंगे आणि आरोग्य सहाय्यिका श्रीमती पाडवी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक श्रीमती अडावं, आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

