(राजापूर)
राजापूर तालुक्यातील आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले श्री. रविकांत केशव रूमडे (मु.पो. धाऊलवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
रूमडे यांनी आपला राजीनामा पत्राद्वारे भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांना दिला आहे. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “मी गेली १२ वर्षे भारतीय जनता पक्षात कार्यरत असून विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र सध्या पक्षाच्या कामकाजासाठी आवश्यक तितका वेळ देता येत नसल्यामुळे मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्विकारावा.”
दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केलेल्या या राजीनाम्याने राजापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. रूमडे हे त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी, संघटन कौशल्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनसंपर्कासाठी ओळखले जातात.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र पक्षातील एक निष्ठावंत आणि सक्रीय कार्यकर्ता बाहेर पडल्याने कार्यकर्त्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

