( पुणे )
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासात केतनला मुद्दाम दरीत ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याची होणारी पत्नी आणि तिचा कथित प्रियकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
गेल्या आठवड्यात, 19 जून रोजी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीय, मित्र असे दोन तीन दिवस फिरायला बाहेर पडले होते. सियाच्या वाढदिवसासाठी केतनने खूप तयारी केली होती. महाबळेश्वरमध्ये तिचा वाढदिवस मस्तपैकी सेलिब्रेट करण्याचा त्याचा प्लान होता. त्याच्या आदल्या दिवशीच तो कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र तिथेच त्याचा घात झाला आणि जीव गेला.
किल्ल्यावर फोटो काढत असताना केतनचा तोल जाऊन तो दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती, तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
प्राथमिक माहितीनुसार, होणाऱ्या पत्नीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. केतनसोबत विवाह नको असल्याने त्याला मार्गातून दूर करण्यासाठी कट रचल्याचा आरोप पोलिसांकडून तपासाअंतर्गत केला आहे. या कटात कथित प्रियकरासह इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
घटना घडल्यानंतर तरुणीने आरडाओरडा करत मदत मागितली होती. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाने संयुक्तपणे बचावकार्य राबवून केतनला दरीतून बाहेर काढले. गंभीर दुखापत झालेल्या केतनला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, केतन आणि संबंधित तरुणीचा विवाह नोव्हेंबरमध्ये होणार होता. लग्नाची तयारीही जोरात सुरू होती. कुटुंबीयांनी जयपूर येथे विवाहसोहळ्यासाठी आलिशान पॅलेस बुक केल्याची तसेच पाहुण्यांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केल्याची माहिती समोर येत आहे.
केतन हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं सिया गोयल हिच्याशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने तयारी सुरू होती. लग्नाचा थाटच वेगळा होता. विविहासाठी जयपूरमधला खासपॅले बूक करण्यात आला होता, येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र लग्नापूर्वीच केतनचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.
दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय बळावला आहे. तथापि, या प्रकरणातील सर्व आरोप अद्याप तपासाधीन असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली. केतन अग्रवाल नेमका दरीत कसा पडला, याचा सखोल शोध घेत असताना लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. या तपासादरम्यान एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या.
घटना घडली त्या दिवशी प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतानाही संबंधित तरुण जाड हुडी परिधान करून फिरत होता. त्याने कानात हेडफोन घातले होते आणि हुडीच्या साहाय्याने चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवली. त्यातून संबंधित तरुणाने केतनला दरीत ढकलल्याचा संशय समोर आला आणि सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागील कथित हत्येचा उलगडा झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून, आरोपींविरुद्ध कोणते गुन्हे दाखल करायचे याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

