(मुंबई)
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने पत्नी व तिच्या प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराला आत्महत्येस जबाबदार धरले आहे. या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण व त्याची पत्नी दोन वर्षांच्या मुलीसह चुनाभट्टीतील सरकारी निवासस्थानात राहत होते. १८ एप्रिल २०२४ रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी यवतमाळ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंत्यसंस्कारानंतर दोन दिवसांनी जेव्हा ते परत चुनाभट्टीतील घरी आले, तेव्हा त्यांच्या लोखंडी कपाटात त्यांचा मुलगा वापरत असलेला मोबाईल सापडला. मोबाईल उघडल्यानंतर त्यात आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सापडला, ज्यात मृत तरुण म्हणतो:
“बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका. आई आणि तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या.”
याशिवाय, मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा फोटो देखील मिळाला असून त्यात त्याने पत्नीच्या अनैतिक संबंधांचा उल्लेख केला आहे.
या धक्कादायक माहितीच्या आधारे मृत तरुणाच्या वडिलांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पत्नी व तिच्या कथित प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात भादंवि कलमान्वये कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.