(रत्नागिरी)
भारत सरकारच्या जनगणना २०२७ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेला सुरुवात झाली असून चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. स्वगणना प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करणारे दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि घरगणनेच्या पूर्वतयारीसाठी १ मे ते १५ मे २०२६ हा कालावधी ‘स्वगणना अभियान’ म्हणून निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर या मोहिमेचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्वतः स्वगणना करून १ मे रोजी जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केला होता.
उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाची या विशेष उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विहित मुदतीत गावातील सर्व नऊ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांची स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण केली.
लोकसंख्येत वाढ; नव्या आकडेवारीत २२६२ लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ इतकी होती. मात्र ताज्या स्वगणना आकडेवारीनुसार गावाची अंदाजित लोकसंख्या आता २२६२ वर पोहोचली असून गावात एकूण ४२५ कुटुंबांची नोंद झाली आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाचे परिश्रम ठरले निर्णायक
ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे तसेच खेडर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामामध्ये प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव आणि प्रिया मोरे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांना शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव तसेच पोलीस पाटील अमित मोहिते यांनी सक्रिय सहकार्य केले.
वाड्यांनिहाय स्वगणनेचा तपशील
शेट्येवाडी – १८ कुटुंबे
गणेशवाडी – ५१ कुटुंबे
बागवाडी – ६७ कुटुंबे
रामवाडी – १८ कुटुंबे
भुवडवाडी – ६४ कुटुंबे
नलावडेवाडी – १०१ कुटुंबे
बडदेवाडी – ३५ कुटुंबे
राजवाडा – २२ कुटुंबे
बौद्धवाडी – ४९ कुटुंबे
एकूण ४२५ कुटुंबांची स्वगणना १०० टक्के पूर्ण करण्यात आली आहे.
दळवटणे गावाने दाखवलेली तत्परता, लोकसहभाग आणि प्रशासनाशी साधलेला प्रभावी समन्वय यामुळे हे गाव आता आगामी जनगणना मोहिमेसाठी आदर्श गाव म्हणून पुढे आले आहे.

