(रत्नागिरी / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना आ. रविंद्र चव्हाण यांनी ॲड. पटवर्धन यांच्यावर सोपविण्यात आलेली नवी जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदावर कोकणातून प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले असून, या संधीचा उपयोग पतसंस्था चळवळीला नवी दिशा देण्यासाठी करावा, असे त्यांनी नमूद केले. तसेच ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या भेटीदरम्यान भाजपा प्रदेश सहसरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. विनय नातू तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वरूपानंद पतसंस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भेटीदरम्यान भाजपा प्रदेशातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ॲड. दीपक पटवर्धन यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वरूपानंद पतसंस्थेला दिलेली ही सदिच्छा भेट आणि झालेल्या चर्चांमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर ॲड. दीपक पटवर्धन यांचे सहकार क्षेत्रातील वाढते महत्त्व आणि कोकणातील नेतृत्वाची दखल या भेटीतून अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

