(ठाणे)
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे येथे एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मोठा खुलासा समोर आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी तक्रारदार महिलेला कथित ‘भोंदूबाबा’ अशोक खरात याच्या कार्यालयात नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ठाण्यातही अशोक खरात याचे कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. खरातचे ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त महेश आहेर यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत नमूद आहे की, महेश आहेर यांनी संबंधित महिलेला विश्वासात घेऊन नाशिक येथील अशोक खरात याच्या कार्यालयात नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध जादूटोणासदृश प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला, तसेच ‘मोती’ हा खडा जबरदस्तीने घालण्यास भाग पाडल्याने पीडित महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. महेश आहेरनं आणखी काही महिलांना अशोक खरातकडं नेल्याचा संशय आहे.
दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत असलेल्या अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईत आणखी तीव्रता आली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत असून या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चीही एन्ट्री झाली आहे. त्यांच्या काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
या घडामोडींमुळे ठाणे आणि नाशिक दरम्यानचे कथित जाळे समोर येत असून, आणखी किती ‘पांढरपेशे’ व्यक्ती अशा प्रकारे या जाळ्यात अडकल्या आहेत, याचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अशोक खरातनं शासकीय आणि निमशासकीय अधिका-यांमध्ये आपलं नेटवर्क तयार केलं होतं. या नेटवर्कचा वापर तो वेगवेगळ्या पद्धतीनं तो करत होता. कधी बदल्या, कधी लैंगिक शोषण, कधी काळा पैसा पांढरा करण्याचं काम तो हुशारीनं करत होता. आता मात्र त्याचं हे नेटवर्क आता उघड पडलं आहे. या पार्श्वभूमीवर महेश आहेर यांचा शोध सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळाली.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सुरू असून, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतरांनीही पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणामुळे ठाणे महापालिकेतील कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत मोठ्या अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.

