(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथे ३ मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
लोटे औद्योगिक वसाहतीतून राजस्थानकडे जात असलेला कंटेनर लवेलजवळ आल्यानंतर चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.
जखमी चालकाला तातडीने नजीकच्या घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात महामार्गावर नुकतेच बसवण्यात आलेले पथदिवे देखील कोसळून नुकसान झाले आहे. पथदिव्यांचे खांब वाकले असून विद्युत यंत्रणेलाही हानी पोहोचली आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली नव्हती, त्यामुळे पुढील तपशील अद्याप समोर आलेला नाही.