(रत्नागिरी)
शिवसेना (ठाकरे गट) मधून हकालपट्टी झाल्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेत असलेल्या बाळ माने यांच्या भाजपा प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. “जो कोणी पक्ष सोडून गेला, त्याला मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश देणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी बाळ माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला सध्या तरी पूर्णविराम दिला आहे.
रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना रविंद्र चव्हाण यांनी ही भूमिका मांडली. त्यांनी नाव न घेता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असा संदेश दिला.
बाळ माने यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भाजपमध्ये प्रवेशासाठी चर्चेत होते. विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून मिळालेली अधिकृत उमेदवारी मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बाळ माने यांच्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती. “बाळ माने हे पूर्वी भाजपचेच सहकारी होते,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे बाळ माने यांची भाजपमध्ये ‘घरवापसी’ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चांना मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, “जे कोणी पक्ष सोडून गेले, त्यांना माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्याने केवळ बाळ मानेच नव्हे तर त्यांच्या संपर्कात असलेले काही अन्य नेतेही सध्या प्रतीक्षेत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या या विधानानंतर कोकणातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे बाळ माने यांच्या राजकीय भवितव्याबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले असून जिल्ह्याच्या राजकारणात या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. माने पुढील काळात कोणती राजकीय भूमिका घेतात आणि त्यांच्या समर्थकांचा कल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

