(मुंबई)
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची अखेर बुधवारी अधिकृत घोषणा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेल येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. आगामी मुंबईसह सात महानगरपालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. या भेटीनंतरच युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, हा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मराठी एकजुटीचा मंगलक्षण आज पुन्हा आला आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच पाठीशी उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आम्ही शपथ घेऊन मैदानात उतरलो आहोत. आमचे विचार समान आहेत. मराठी माणूस तुटला तर महाराष्ट्र कमकुवत होईल. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्यासाठीच ही एकत्र येण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भूमिकेतूनच एकत्र येण्याची सुरुवात झाली. जागावाटपाचा तपशील सध्या सांगणार नाही, योग्य वेळी तो जाहीर केला जाईल. महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता ती मनसे–शिवसेना युती आज झाली आहे. मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत. त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना व मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत.”
मनसे–शिवसेना ठाकरे गटाच्या या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मराठी मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

