(मुंबई)
ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे आज, ११ डिसेंबर रोजी सकाळी ९:१५ वाजता, अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने त्यांचे दु:खद निधन झाले.
७ फेब्रुवारी १९४७ रोजी बांद्रा येथे जन्मलेल्या अनिलजींचे प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये तर उच्च शिक्षण नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे झाले. ते अविवाहित होते.
कुटुंबीय – मधुसूदन कालेलकर, आई – मीना कालेलकर, बंधू – सुनील, सुधीर, शिरीष कालेलकर, भगिनी – जयश्री कालेलकर
त्यांनी आपली भाची गौरी कालेलकर चौधरी यांच्या सोबत ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन’ ची स्थापना केली होती. ते दीर्घकाळ साहित्य सहवास, बांद्रा (पूर्व) येथे वास्तव्यास होते.
बहुआयामी साहित्य–कलाकार
अनिलजींच्या लेखनाचा व्यास विशाल आणि उल्लेखनीय होता.
- २५ हून अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन
- २५ पेक्षा अधिक हिंदी–मराठी–गुजराती मालिकांचे लेखन — एवढ्या मोठ्या प्रमाणात सातत्याने लेखन करणारे ते मोजकेच लेखक
- १७ मालिकांचे सलग लेखन — दूरदर्शन क्षेत्रातील अभूतपूर्व विक्रम
- १२ सस्पेन्स–थ्रिलर मालिका (हिंदी + मराठी) — सर्वच मालिकांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
- कारकिर्दीत ३०० हून अधिक विविध विषयांवर लेखन, आणि प्रत्येक विषयावर प्रभावी मांडणी
- ‘बंदिनी’, ‘परमवीर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’ — तीनही मालिकांना सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळून अनोखी ‘हॅटट्रिक’
आज अनेक चॅनल्सवर दिसणाऱ्या कथा–संकल्पना, फॉरमॅट्स आणि विषय अनिलजींनी अनेक दशकांपूर्वीच दूरदर्शनवर रुजवले होते.त्यांच्या निधनाने मराठी–हिंदी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील अनुभवी आणि प्रतिभासंपन्न लेखक हरपला आहे.

