(सातारा)
साताऱ्यातील फलटण शहरात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरच्या तळहातावरच ‘सुसाइड नोट’ लिहिलेली आढळली असून, त्यात तिने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मृत डॉक्टरचे नाव डॉ. संपदा मुंडे (वय ३०) असे असून, त्यांनी काल रात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण राज्य हादरले आहे.
सुसाइड नोटमधील आरोप
डॉ. मुंडे यांनी तळहातावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे, “माझ्या मरण्याचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आहे. ज्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला आणि पोलीस प्रशांत बनकर, ज्याने मागील चार महिन्यांपासून माझा शारीरिक व मानसिक छळ केला.”
या पत्रातून दोन वरिष्ठ पोलिसांवर थेट आरोप करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली असून, या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास आणि कारवाई
माहितीनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांमधील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भातील चौकशीमुळे त्या तीव्र मानसिक तणावात होत्या. त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करत “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आयुष्य संपवेन,” असेही लिहिले होते.
या प्रकरणानंतर डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनीही पोलिस आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले, “माझ्या मुलीवर वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव टाकला जात होता. या सततच्या त्रासामुळे ती खूप तणावाखाली होती. ‘मला जर पुन्हा त्रास दिला तर मी आत्महत्या करेन,’ असं ती अनेकदा म्हणायची.” वडिलांनी पुढे सांगितले की, संपदाने या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रारही दिली होती, मात्र त्या तक्रारीवर कोणतेही उत्तर आले नाही. “रिपोर्टमध्ये बदल करण्याच्या दबावाला ती सहन करू शकली नाही आणि अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले,” असा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
या आत्महत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सर्व पुरावे ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही.”
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले, “सुसाइड नोटमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलिस अधीक्षकांना तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई होईल.”
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, “जे पोलीस नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात, तेच अत्याचार करत असतील तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? राज्याचा गृहविभाग झोपलाय का?”
या प्रकरणी फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी अधिकाऱ्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संताप आणि संतापाची लाट उसळली असून, वैद्यकीय आणि महिला संघटनांकडून “डॉ. संपदाला न्याय मिळाला पाहिजे” अशी मागणी होत आहे.

