(रायगड / जिमाका)
रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’मधील तो वर्ग एरवीप्रमाणेच होता; पण त्या दिवशी तिथे एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर शाळेला भेट देण्यासाठी आले होते. त्या गर्दीत इयत्ता चौथीत शिकणारी एक चुणचुणीत विद्यार्थिनी आत्मविश्वासाने उभी होती. तिचे नाव होते — यशश्री मिठू घुले.
चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता, उलट डोळ्यांत उत्सुकतेची चमक होती. शिक्षिका साधना पाटील यांच्या मार्गदर्शनावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर यशश्री थेट मुख्यमंत्र्यांसमोर उभी राहिली आणि अत्यंत आत्मीयतेने त्यांचे स्वागत करत मुलाखतीला सुरुवात केली.
एका छोट्याशा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यावी, हीच गोष्ट उपस्थितांसाठी आश्चर्याचा आणि कौतुकाचा विषय ठरली. हातातील फाईल उघडत यशश्रीने पहिलाच प्रश्न विचारला,
“सर, आपले नाव काय?”
तिच्या निरागस पण स्पष्ट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनीही तितक्याच आपुलकीने उत्तर दिले,
“माझे नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.”
यानंतर यशश्रीने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
“सर, आपल्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?” असा प्रश्न तिने विचारला.
मुख्यमंत्र्यांनीही अगदी सोप्या आणि रंजक शब्दांत उत्तर देत सांगितले की, त्यांच्या प्रवासाची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. विद्यार्थी परिषदेत काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत त्यांनी सामाजिक कार्याचा मार्ग स्वीकारला आणि त्यातूनच पुढे राजकारणात प्रवास घडत गेला.
संवाद रंगत असतानाच यशश्रीने आणखी एक प्रगल्भ प्रश्न विचारला,
“सर, सामाजिक काम करताना कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केली?”
या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत समजूतदारपणे उत्तर दिले. ते म्हणाले,
“जेव्हा आपण समाजात चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जुन्या व्यवस्थेला बदलावे लागते. त्यामुळे अडचणी आणि संघर्ष येतातच. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श आपल्याला प्रेरणा देतात. प्रामाणिकपणे काम करत राहिलो, तर यश नक्की मिळते.”
मुख्यमंत्र्यांचे हे विचार ऐकताना उपस्थित शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी भारावून गेले होते.
मुलाखतीचा शेवट मात्र अधिकच संस्मरणीय ठरला. यशश्रीने शेवटचा प्रश्न विचारला,
“सर, आपल्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुम्हाला कायम लक्षात राहील?”
यावर मुख्यमंत्र्यांनी हसतच उत्तर दिले,
“माझ्या आयुष्यात अनेक अनुभव आहेत; पण आज तु घेतलेली ही मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील.”
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने संपूर्ण वर्गात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी यशश्रीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तर मुख्यमंत्र्यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिचे अभिनंदन केले.
एका शिक्षिकेचे मार्गदर्शन, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा आत्मविश्वास आणि डिजिटल शिक्षणाची ताकद यांचे हे सुंदर उदाहरण ठरले. ‘प्रवेशोत्सव’ आणि शाळेतील ‘डिजिटल लॅब’ खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. आणि त्या दिवसानंतर मुख्यमंत्रीही वहाळ शाळेच्या या छोट्या ‘यशश्री’चे चाहते झाले…!

