(रत्नागिरी)
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या जून-जुलै २०२६ मधील परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कडक पावले उचलण्यात आली आहेत. या वर्षी संपूर्ण परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षातील (२०२५-२०२६) फेरपरीक्षांचे वेळापत्रक व विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
इयत्ता १० वी लेखी परीक्षा: १६ जून २०२६ ते ३० जून २०२६
इयत्ता १२ वी लेखी परीक्षा: १६ जून २०२६ ते ०८ जुलै २०२६
एकूण परीक्षा केंद्रे: विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत एकूण ११ केंद्रे असून, त्यापैकी १० वी साठी ६ व १२ वी साठी ५ केंद्रे आहेत. याशिवाय ४ परिरक्षक केंद्रे आहेत.
विद्यार्थी संख्या (१० जून २०२६ अखेर): १० वीसाठी १९० विद्यार्थी, तर १२ वीसाठी ५४५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
कर्मचाऱ्यांवरही राहणार लक्ष
परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना सर्व शाळा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित स्टोअर (जतन) करून ठेवावे लागणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून येतील, तेथे तात्काळ कठोर कारवाई केली जाईल. केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे, तर परीक्षेशी निगडीत असणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार होईल, त्यांच्यावरही कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा स्तरीय दक्षता समिती’ काम करत असून, संपूर्ण परीक्षा कालावधीसाठी ०४ भरारी पथकांची (Flying Squads) स्थापना करण्यात आली आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्ड परीक्षेचे कामकाज नियोजनबद्ध करता यावे, यासाठी मंडळाने “बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे” या मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती केली आहे. यामध्ये शाळांनी महिनानिहाय करायच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाची माहिती दिली आहे.
उत्तरपत्रिकांचे अचूक लेखन कसे करावे, याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने महत्त्वाच्या विषयांचे मार्गदर्शक व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर आणि यूट्युबवर विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
संपूर्ण परीक्षा पारदर्शक व तणावमुक्त वातावरणात पार पडेल, असा विश्वास कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनिता गुरव आणि विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

