(रत्नागिरी)
येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम राबवत झाडगाव एमआयडीसी परिसरात तब्बल २५०० सीडबॉल्सची पेरणी करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा विचार पुढे ठेवत मंडळाने यंदा प्रथमच बीजारोपणाचा पर्याय स्वीकारून पर्यावरण जपण्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, लागवड केलेल्या रोपांची वर्षभर देखभाल करणे, त्यासाठी संरक्षक जाळी उभारणे तसेच सात-आठ फूट उंचीची रोपे उपलब्ध करणे, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आणि मनुष्यबळाची आवश्यकता भासत होती. याशिवाय, काही ठिकाणी वाढलेली रोपे तसेच संरक्षक जाळी गायब होण्याचे अनुभवही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा मंडळाने पारंपरिक वृक्षारोपणाऐवजी बीजारोपणाचा पर्यावरणपूरक आणि प्रभावी पर्याय निवडला.
या उपक्रमासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांना सीडबॉल्स किंवा मातीमध्ये बियांच्या पुड्या तयार करून आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महिला, पुरुष तसेच लहान मुलांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदस्यांनी आंब्याच्या विविध जाती, फणस, जांभूळ, रातांबे, बदाम आदी वृक्षांच्या बिया जमा करून त्यापासून सीडबॉल्स तयार केले.
अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडे नष्ट झाली असून, त्यामुळे पक्षी, प्राणी तसेच प्रवाशांना उन्हापासून संरक्षण देणारी सावली कमी होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन उद्यमनगर, झाडगाव एमआयडीसी येथील सिमेंट कंपनी परिसरालगतच्या महामार्गाच्या दुतर्फा मंडळाच्या सदस्यांनी सुमारे २५०० सीडबॉल्सची पेरणी केली.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यात हिरवाई वाढवण्याचा संदेश देण्यात आला असून, समाजातील इतर संस्थांनीही अशा उपक्रमांमधून पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

