(रत्नागिरी / वार्ताहर)
येथील गोळप ग्राम परिसरात वारंवार खंडित होणा-या वीजप्रवाहामुळे येथील ग्रामस्थांसह वीज ग्राहक हैराण झाले असून सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यात सतत अपयशी ठरणा-या वीज वितरण कंपनीबाबत ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत गोळप परिसरातील काही वाड्यांना नेहमीच वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कधी फिडर फॉल्टी आहे, तर कधी फिडरची वायर तुटली आहे अशी कारणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. सोमवार हा वीजेच्या मेंटेनन्ससाठी महावितरणचा हक्काचा वार असल्याने यादिवशी तर कधी कधी दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवला जात असून इतर दिवशीही सलग पाच सहा तास ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याने येथील वीज ग्राहकांना वीजेअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
‘स्मार्ट’ मीटरचे फायदे ग्राहकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणारे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याची ‘स्मार्ट’ सेवा देण्यात मात्र कमी पडत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. रात्री अपरात्री केव्हाही सतत वीज प्रवाह खंडित होणे ही नेहमीचीच समस्या झाली असल्याने आणि रात्रीच्या वेळी खंडित झालेला वीज पुरवठा सुरू होण्यासाठी कायम सकाळपर्यंत वाट पहावी लागत असल्याने अशी परिस्थिती गणेशोत्सवाच्या काळातही चालू राहिल्यास महावितरण कंपनीला गोळप व परिसरातील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

