(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नुकतीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर पालवे यांची संगमेश्वर येथे नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मूळचे अहिल्यानगर येथील असलेले गजेंद्र पालवे हे पोलीस दलातील अभ्यासू, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिस्तप्रिय कार्यपद्धती, कायदा-सुव्यवस्थेबाबतची कटाक्षाने भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची त्यांची कार्यशैली यामुळे त्यांनी आजवर सेवा बजावलेल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी छाप निर्माण केली आहे.
पोलीस प्रशासनातील त्यांचा अनुभवही उल्लेखनीय आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी चार वर्षे यशस्वी सेवा बजावली. त्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच ठाणे ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून तब्बल सहा वर्षे त्यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले आहे. कोकण परिसराशीही त्यांचा जवळचा संबंध राहिला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि बांा पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रभावी काम केले आहे.
विविध सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत असून, गुंतागुंतीच्या प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला असल्याने येथे वाहतूक व्यवस्थापन, पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असते. गजेंद्र पालवे यांच्या नियुक्तीमुळे तालुक्याला अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी लाभल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या सहकार्याने जनतेला सुरक्षित वातावरण देणार : गजेंद्र पालवे
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे म्हणाले, “संगमेश्वर तालुक्याला सांस्कृतिक आणि सामाजिक शांततेची समृद्ध परंपरा लाभली आहे. या तालुक्यात सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी जबाबदारीची बाब आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे, ही माझी प्रमुख प्राथमिकता असेल. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी आमचे पथक प्रयत्नशील राहील. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावर माझा भर राहील. आगामी काळातील वाहतूक व्यवस्थापन आणि पावसाळ्यातील विविध आव्हानांचा सामना स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण आणि नागरिकांच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.”

