( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील पत्रकारांनी आंदोलनाची तयारी सुरू केली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी (दिनांक 25 मार्च ) चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात काही सामाजिक कार्यकर्ते बहादूरशेख नाका येथे उपोषणास बसण्याच्या तयारीत होते. त्या घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही जणांनी अचानक झडप घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेने उपस्थितांमध्ये क्षणात खळबळ उडाली. मारहाणीबरोबरच त्यांचा मोबाईल आणि अन्य साहित्यही हिसकावून नेण्यात आल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. या घटनेचे चित्रीकरण परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर केले असून संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. दृश्यांमध्ये काही हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा होत असताना, अद्याप प्रत्यक्ष अटकेची कारवाई न झाल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुरावे समोर असताना कारवाईचा वेग मंद का? हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७ अंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. कायद्याची तरतूद कठोर असली तरी त्यानंतरची अटकेची कारवाई अपेक्षेइतकी दिसून येत नसल्याची भावना पत्रकारांमध्ये तीव्र झाली आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी स्पष्ट भूमिका घेत पुढील चार दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येईल, असा निर्णय घेतला. त्यानंतर आंदोलन अधिक व्यापक करण्याची आणि गरज पडल्यास जिल्हास्तरावरही लढा उभारण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील आक्रमण म्हणून न पाहता, लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दिलेले उघड आव्हान म्हणून पाहिले जात आहे. वार्तांकन करत असताना पत्रकाराला लक्ष्य केले जाते आणि त्यानंतरही आरोपी मोकाट राहतात, ही बाब चिंतेची असल्याचे मत पत्रकारवर्तुळातून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कायद्याचा धाक कृतीतून दिसणे आवश्यक आहे, अशी मागणी आता अधिक गडद होत आहे. पोलिसांनी निष्पक्ष, तातडीची आणि ठोस कारवाई करून विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

