( मुंबई )
अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराविरोधात धडक भूमिका घेतली आहे. रुग्णांना रुग्णालयातीलच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बाहेरून औषधे खरेदी करणे हा रुग्णांचा कायदेशीर आणि वैयक्तिक अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गुटखा, प्रतिबंधित पान मसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभरात मोठी कारवाई केल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आरोग्य व्यवस्थेकडे वळवला आहे. त्यांच्या नव्या आदेशामुळे खासगी रुग्णालयांच्या एकाधिकारशाहीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयांकडून जबरदस्तीच्या तक्रारी
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, अनेक रुग्णालयांविरोधात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातीलच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, कायद्यानुसार कोणतेही रुग्णालय किंवा संस्था रुग्णांवर अशी सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे, हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. अनेक वेळा रुग्णालयाबाहेरील मेडिकल स्टोअर्समध्ये तीच औषधे कमी दरात किंवा जेनेरिक स्वरूपात उपलब्ध असतात. मात्र, काही खासगी रुग्णालये अंतर्गत नियमांचा हवाला देत बाहेरून औषधे आणण्यास मज्जाव करतात.
डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन देणे बंधनकारक
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, आता रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात औषधांचे प्रिस्क्रिप्शन देणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही नोंदणीकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. विशिष्ट ब्रँडची औषधे उपलब्ध नसल्यास रुग्णांना जेनेरिक औषधांचा पर्याय निवडण्याचीही मुभा असेल. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नियम मोडल्यास थेट एफडीएकडे तक्रार
रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातीलच मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला. नागरिकांना अशा प्रकारांविरोधात थेट अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवता येणार असून प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एफडीएच्या या निर्णयामुळे रुग्णालयांमधील औषध खरेदीतील मनमानी आणि जादा दर आकारणीला आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

