(रत्नागिरी)
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे पर्व मोठ्या उत्साहात नववर्षाच्या पहिल्या रविवारी यशस्वीपणे पार पडलं. यामध्ये रत्नागिरीतील ६७ धावपटूंनी २१ किलोमीटरची स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण केली. याबद्दल आज मॅरेथॉनच्या रविवारच्या प्रॅक्टिस रनप्रसंगी रत्नागिरीतील विविध संस्थांनी या धाववंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. थिबा पॅलेस रोड येथे हा छोटेखानी कार्यक्रम झाला.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये ३०० शहरांमधून २२०० धावपटू सहभागी झाले. अतिशय कस लावणारा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अनेक धावपटूंचा त्यांच्या- त्यांच्या शहरात नागरी सत्कार झाला आणि खऱ्या अर्थाने कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सर्वदूर पोचली. कुठलीही स्पर्धा तेव्हाच मोठी होते जेव्हा त्यात स्थानिकांचा सहभाग देखील मोठा असतो, २२०० सहभागी धावपटूंपैकी जवळपास ३५ टक्के सहभाग रत्नागिरीकरांचा होता आणि ६७ जणांनी हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची दर रविवारी प्रॅक्टिस रन असते. मागच्या रविवारी मॅरेथॉन झाली, पण रत्नागिरीकरांना वेध लागले आहेत सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे. दर रविवारप्रमाणे प्रॅक्टिस रनसाठी धाववंतांनी गर्दी केली.
हॉटेल असोसिएशनतर्फे उदय लोध, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन, सुवर्णकार संघटनेचे महेश खेडेकर, क्रेडाईचे अध्यक्ष महेश गुंदेचा, सिटी बॅडमिंटनच्या सौ. सरोज सावंत, जैन समाजतर्फे संजय जैन, कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे मानस देसाई, करसल्लागार असोसिएशनतर्फे उपाध्यक्ष सीए अभिजीत पटवर्धन, केमिस्ट असोसिएशनचे सचिन कोतवडेकर, व्यापारी संघटनेचे अमोल डोंगरे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गौरव सावंत, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉ. प्रसन्न मुळे यांनी २१ किमी पूर्ण करणाऱ्या धाववंतांचे विशेष कौतुक केले.

