(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडी येथील स्मशानभूमीत लांजा तालुक्यातील केळवली येथील प्रकाश गणू कोटकर (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील शैलजा पवार आणि साखरपा ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत लिंगायत यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे यांच्यासह स्वप्नील कबळे व गणेश सुतार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या खिशात आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

