( मुंबई )
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळबंद 2’ची जोरदार चर्चा सुरू असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजपासूनच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असलेल्या या चित्रपटाने आता अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटालाही ‘देऊळबंद 2’ने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘देऊळबंद 2’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत आतापर्यंत 73.16 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. यापैकी चित्रपटाने महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवर तब्बल 62 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाचा वेग पाहता लवकरच तो 75 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिलीजच्या 20 व्या दिवशीही चित्रपटाची कमाई मजबूत राहिली. चित्रपटाने एका दिवसात 1.1 कोटी रुपयांची कमाई केली. 19 व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत 4.34 टक्क्यांची घट झाली असली, तरी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे.
‘देऊळबंद 2’च्या कमाईचा प्रवास पाहिला तर पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 30.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 22.4 कोटींचा व्यवसाय झाला. त्यानंतर 16 व्या दिवशी 1.4 कोटी, 17 व्या दिवशी 2.6 कोटी, 18 व्या दिवशी 3.15 कोटी, 19 व्या दिवशी 1.15 कोटी आणि 20 व्या दिवशी 1.1 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली.
या दमदार कमाईसह ‘देऊळबंद 2’ मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रितेश देशमुख अभिनित ‘वेड’च्या नावावर होता. ‘वेड’ने 61.2 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘राजा शिवाजी’ 105.64 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ‘सैराट’ने 90 कोटींची कमाई करत दुसरे स्थान मिळवले आहे. ‘बाईपण भारी देवा’ 76.28 कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर असून आता ‘देऊळबंद 2’ने 62 कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
याशिवाय ‘नटसम्राट’ (42 कोटी), ‘पावनखिंड’ (37.72 कोटी), ‘लय भारी’ (37 कोटी), ‘कट्यार काळजात घुसली’ (35 कोटी) आणि ‘ठाकरे’ (31.6 कोटी) हे चित्रपटही टॉप 10 यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

