(सिंधुदुर्ग)
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा या प्रसिद्ध समुद्रकिनारी आज (शुक्रवारी) संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. समुद्रस्नानासाठी गेलेल्या आठ पर्यटक बुडाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेळगाव येथील पर्यटक कुडाळ येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथून ते शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी आले. समुद्रात मौजमस्ती करत असताना हे आठ जण बेपत्ता झाले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक मुलीला वाचविण्यात यश आले आहे. इसरा इम्रान कितुर असं या मुलीचे नाव आहे. या मुलीला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर उर्वरित चार जणांचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तिघांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले असून, पुढील कार्यवाहीसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अद्याप चार जणांचा शोध सुरू असून, स्थानिक प्रशासन, पोलीस व बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.
स्थानिक लोकांकडून आणि बचाव पथकाकडून उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार बेळगाव येथून एक कुटुंब पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. हे कुटुंबीय कुडाळ येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी राहिले होते. त्यानंतर दुपारी शिरोडा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्रित जेवण केलं आणि नंतर काही जण शिरोडा येथील वेडाघर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. दरम्यान, 8 जणांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेच्या प्रवाहात वाहून गेले. या कुटुंबातील लोक पाण्यात बुडत असल्याचं एका महिलेनं पाहिलं आणि तिने आरडाओरडा केला.
समुद्रात बुडालेल्या पर्यटकांची नावे
- इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष 17 रा. लोंढा, बेळगाव (हयात)
- फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
- इबाद इरफान कित्तूर , वय 13 रा. लोंढा, बेळगाव (मयत)
- नमीरा आफताब अख्तर वय 16, रा अल्लावर, बेळगाव (मयत)
बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे
- इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय 36 रा. लोंढा, बेळगाव
- इक्वान इमरान कित्तूर, वय 15 रा. लोंढा, बेळगाव
- फरहान मोहम्मद मणियार, वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
- जाकीर निसार मणियार वय 13, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.

