(राजापूर / वार्ताहर)
जैतापूर खाडीपुलावरून नियमबाह्य आणि धोकादायक पद्धतीने टाकण्यात आलेल्या विद्युत केबलमुळे पुलाचे विद्रुपीकरण झाल्याचा मुद्दा गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते राजन लाड यांनी पुढाकार घेत थेट मुख्य विद्युत निरीक्षक (CIE), रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयाने महावितरणच्या रत्नागिरी विभागाला तातडीने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
जैतापूर खाडीपूल हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, त्यावरून टाकण्यात आलेली हायव्होल्टेज केबल ही नियमबाह्य आणि धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केबल उघड्या व असुरक्षित पद्धतीने टाकल्यामुळे केवळ पुलाचे सौंदर्य बिघडले नाही, तर भविष्यात गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत असल्याचा मुद्दा राजन लाड यांनी प्रशासनासमोर मांडला आहे.
प्रशासनाकडून तपासाचे आदेश
मुख्य विद्युत निरीक्षकांच्या आदेशानंतर महावितरणकडून आता या संपूर्ण प्रकरणाची पाहणी आणि तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. काम नियमांनुसार झाले आहे का, तसेच सुरक्षिततेच्या अटींचे पालन झाले आहे का, याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
“लढा सुरूच राहणार” – राजन लाड
“जोपर्यंत केबल योग्य व सुरक्षित पद्धतीने बसवली जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. प्रशासनाने नियमांकडे दुर्लक्ष करून हे काम केल्यासारखे दिसते. आवश्यक असल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने पुढे जाऊ,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजन लाड यांनी दिला आहे.
नागरिकांचा पाठिंबा
या प्रकरणात राजन लाड यांनी घेतलेल्या भूमिकेला स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुलाच्या सुरक्षिततेचा आणि विद्रुपीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने आता महावितरणच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

