(मुंबई)
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून मागील कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये विविध कारणांमुळे लाभ न मिळालेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकार या योजनेसाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही वर्षांपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विविध शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने करण्यात येत होती. अखेर राज्य मंत्रिमंडळाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून औपचारिक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

