(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका खाजगी मालकीच्या जंगलात ‘रॉयल बंगाल’ वाघाची उपस्थिती नोंदवली गेली असून, जंगलात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद झाला आहे. या नोंदीमुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सह्याद्रीच्या जंगलपट्ट्यातील जैवविविधतेसाठी ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.
वन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, संगमेश्वर परिसरात सुरू असलेल्या संवर्धन प्रयत्नांचे हे सकारात्मक फलित असल्याचे मत व्यक्त केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने वन विभागाने विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविले आहेत. या माध्यमातून जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून या जंगलाचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. वृक्षतोड, मानवी हस्तक्षेप आणि अधिवासाच्या ऱ्हासामुळे दबावाखाली आलेल्या या वनक्षेत्राला पुन्हा नैसर्गिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जवळपास दोन दशकांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. त्यातून निर्माण झालेल्या पोषक अधिवासामुळे विविध वन्यजीवांचे वास्तव्य वाढले असून, आता वाघाची नोंद झाल्याने या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असलेला वाघ एखाद्या परिसरात आढळणे म्हणजे त्या भागातील पर्यावरणीय संतुलन, पुरेसे भक्ष्यसाठे आणि सुरक्षित अधिवास अस्तित्वात असल्याचे द्योतक आहे. त्यामुळे संगमेश्वर परिसरातील ही नोंद केवळ एका वन्यप्राण्याच्या दर्शनापुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसंस्थेच्या सुदृढतेची साक्ष देणारी घटना म्हणून पाहिली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलांमध्ये वाढती जैवविविधता आणि संवर्धन उपक्रमांचे सकारात्मक परिणाम यामुळे भविष्यात या परिसराचे वन्यजीव पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्व अधिक अधोरेखित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगमेश्वरच्या जंगलात वाघाच्या उपस्थितीची झालेली नोंद ही कोकणातील पर्यावरण संवर्धन चळवळीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

