(चिपळूण)
अत्यंत उत्कंठावर्धक आणि हाय व्होल्टेज अंतिम सामन्यात दसपट्टी क्रीडा मंडळ (दसपटी) संघाने न्यू हिंद क्रीडा मंडळ (चिपळूण) संघावर मात करत कालभैरव चषक २०२६ वर सलग दुसऱ्या वर्षी आपले नाव कोरले. या स्पर्धेत भडगाव खेड संघाने तृतीय, तर खेड भरणे संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. ही स्पर्धा स्वर्गीय बापूजी सागावकर मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सामन्यावेळी भैरी देवस्थान चे संपूर्ण विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उमेशजी सकपाळ (नवनिर्वाचित नगराध्यक्ष, चिपळूण नगरपरिषद), समीर दादा भास्करशेठ जाधव (माजी नगरसेवक व उद्योजक), बाळासाहेब कदम (शिवसेना उबाठा विधानसभा क्षेत्र प्रमुख), समीप ठसाळे (यामाहा मोटरचे मालक) तसेच योगेश बंडागळे (पत्रकार) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यापूर्वी भैरी देवस्थानतर्फे सादर करण्यात आलेल्या पारंपरिक ढोलवादनाने मैदानातील वातावरण भारावून गेले. या ढोलवादनामुळे शिमगोत्सवाची चाहूल लागल्याचा अनुभव क्रीडारसिकांनी घेतला.
न्यू हिंद विजय संघाच्या वतीने सौरभ नाटुस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. तर दसपट्टी क्रीडा मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचा माजी कर्णधार स्वप्नील दिलीपराव शिंदे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल सेवन स्टार क्रीडा मंडळ चे विशेष कौतुक केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेवन स्टार मित्र मंडळाकडून श्रीनिवास रेडीज, अमित कांबळी, श्रीराज रेडीज, दिनेश राऊत, भाऊ लकेश्री, संजय घोरपडे, परेश जानवलकर तसेच ॲड. विश्वजीत मनोहर यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.

