(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिंदेंआंबेरी नजिक काल ( गुरुवार) रात्री अकरा वाजताच्या दरम्याने सावंतवाडी कडून मुंबई कडे भरधाव वेगात जाणाऱ्या वेतोबा ट्रॅव्हल्सची लक्झरी क्रमांक MH 48 DC 9439 ने चिपळूणहून संगमेश्वरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 08 TC 147 ला जोरदार धडक देत उडवले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अपघात झाल्याचे यावेळी उपस्थिताकडून अनेकांकडून बोलले जात आहे.
काल ( गुरुवार) रात्री अकरा वाजता सावंतवाडीहून मुंबई कडे जाणारी लक्झरी (MH 48 DC 9439) ने शिंदेंआंबेरी नजिक आरवली घाटात डाव्हर्शन चे योग्य नियोजन नसल्याने चिपळूणहून संगमेश्वर कडे येणाऱ्या दुचाकिस्वारास जोरदार धडक देत अक्षरशः चेंडू सारखे उडवले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याचवेळी चिपळूणकडून येणारे तुरळ येथील विक्की आंबूर्ले यांनी ही घटना पहिली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जितेंद्र चव्हाण यांना फोन केला. जितेंद्र चव्हाण व पत्रकार मिलिंद चव्हाण तसेच चैतन्य परकर हे तात्काळ अपघातस्थळी पोहचले. जितेंद्र चव्हाण यांनी संगमेश्वर येथील खाजगी रुग्णवहीका बोलावून व संगमेश्वर पोलिसांना अपघाताची खबर देत सदर जखमीस डेरवण येथे खासगी रुग्णवाहिकेने पाठवले. जितेंद्र चव्हाण यांनी अपघाताची माहिती दिली असता संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे व त्यांचे सहकारी पोलीस तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले होते.
अपघातग्रस्त खासगी लकझरी बस मधून ३५ प्रवाशी प्रवास करत होते. पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे यांनी सदर प्रवाशांची पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी लक्झरी मालकास संपर्क करून रात्री २ वाजता या सर्व प्रवाशांना मुंबईकडे रवाना केले. सदर लक्झरी बस चा चालक आर्यन अवधूत भेरे (वय 23) राहणार आरवली वेंगुर्ला हा अपघात होताच त्याच्या ताब्यातील लकझरी बस सोडून तेथून फरार झाला होता.
आरवली येथे डाव्हर्शन दर्शवणारे सांकेतिक फलक नसल्याने वाहन चालक महामार्गच्या दोन्ही बाजूने येजा करत होते. डायव्हर्शन सकेंतिक फलक नसल्यामुळे दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने आत घुसला व भरधाव येणाऱ्या बस ने त्याला उडवले. अपघात झाल्यानंतर उपस्थित तरुणांनी पोलिसांच्या सहाय्याने अखेर आरवली येथे फलक लावले. ठेकेदारांच्या गलथान कारभाराबाबत उपस्थित ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.