(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील आरोग्य मंदिर परिसरात आज (शनिवारी) संध्याकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिकेमध्ये अपघात झाला. सुदैवाने रुग्णवाहिका रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास एसटी स्टँडवरून गणपतीपुळेच्या दिशेने जाणारी एसटी बस आरोग्य मंदिर परिसरातून जात होती. त्याच वेळी उद्यम नगर येथील रुग्णालयात रुग्ण आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची बससोबत जोरदार धडक झाली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, एसटी बसची दर्शनी काच फुटली, तर रुग्णवाहिकेचा टायरही फुटला. रुग्णवाहिका रुग्ण घेण्यासाठी जात असल्याने ती रिकामी होती. जर रुग्णवाहिकेत रुग्ण असता, तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.
अपघातानंतर आरोग्य मंदिर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

