(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवड प्रक्रियेत हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुयोग कांबळे यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या निवडीकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
अत्यंत चुरशीच्या आणि राजकीय समीकरणांनी रंगलेल्या निवडणुकीत विजय मिळवत पुढे आलेले समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे यांच्यासमोर आता केवळ पदाची जबाबदारी नाही, तर जनतेच्या अपेक्षांचे ओझेही तितकेच मोठे आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास केवळ राजकीय विजयापुरता मर्यादित नसून, तो न्याय्य निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलतेचीही कसोटी ठरणार आहे. समाजकल्याण विभागासारख्या थेट सर्वसामान्यांच्या हिताशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या समितीची धुरा सुयोग कांबळे यांच्या हाती सोपविण्यात आल्याने ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न, वंचित घटकांच्या योजना आणि विकासाभिमुख उपक्रमांना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचविणे ही त्यांच्यासमोरील पहिली मोठी जबाबदारी मानली जात आहे. अनेकदा कागदोपत्री राहणाऱ्या योजनांना प्रत्यक्ष अंमलबजावणीचे बळ देत, प्रशासनातील विलंब आणि अडथळे दूर करण्यासाठी ठोस भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पारदर्शकता आणून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. याचबरोबर समाजकल्याण विभागातील निधीचे न्याय्य वितरण, स्थानिक गरजांना प्राधान्य आणि तक्रारींवर तत्पर निर्णय यावर त्यांच्या कार्यशैलीचे मूल्यांकन होणार आहे.
अत्यंत चुरशीच्या लढतीतून निवडून आलेले नेतृत्व म्हणून सुयोग कांबळे यांच्याकडून पक्षीय चौकटीपलीकडे जाऊन सर्व घटकांना समान न्याय देणारी भूमिका अपेक्षित आहे. जनतेशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांचा प्रत्यक्ष आढावा आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवत निर्णय घेतले, तर त्यांच्या नेतृत्वाला व्यापक स्वीकार मिळू शकतो. त्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत त्या गटाचे राजकीय वजन अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेत झालेल्या या निवडीनंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, विविध स्तरांतून सुयोग कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

