(रत्नागिरी)
अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनकार ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांच्या कीर्तन रंग महोत्सवाला पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिरसाने ओथंबलेल्या या कीर्तनाचा भाविकांनी मनसोक्त आनंद घेतला. ही कीर्तने पुढील दोन दिवस, दि. ४ व ५ जून रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत जयेश मंगल कार्यालय येथे रंगणार आहेत.
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, वात्सल्य-स्नेह यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जयेश मंगल पार्क आणि खल्वायन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी जयेश मंगल पार्कच्या संचालिका सौ. कल्याणी मलुष्टे, चित्पावन मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, पावस येथील राम मंदिराचे आबा चिपळूणकर, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी तसेच अविनाश काळे उपस्थित होते.
चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक व निवेदन केले. कीर्तनाला ऑर्गनवर कौस्तुभ परांजपे तर तबल्यावर अमेय हर्डीकर यांनी सुरेल साथ दिली. रोहिणीताईंच्या रसाळ, ओजस्वी आणि भक्तिमय वाणीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


