(दापोली)
दापोली-खेड राज्य मार्गावर रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील टाळसुरे शाळेजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिल्पा सुरेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा साळवी या दापोली येथील आर्यावर्त संस्थेत अनेक वर्षांपासून स्वयंपाक मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे त्या सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. रविवारी काम आटोपल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे पायी आपल्या टाळसुरे येथील घरी निघाल्या होत्या.
विशेष म्हणजे, त्यांची विवाहित मुलगी सुट्टीसाठी मुंबईहून दाभोळ येथे आली होती. घरी जाताना शिल्पा साळवी यांनी मुलीशी फोनवर संवाद साधला आणि तिच्यासाठी आंबेही खरेदी केले होते. मात्र, हा फोन त्यांच्या आयुष्यातील अखेरचा संवाद ठरला.
सायंकाळच्या सुमारास टाळसुरे शाळेजवळ त्या रस्त्याने चालत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. संध्याकाळची वेळ आणि रस्त्याला वर्दळ नसल्याने गंभीर जखमी झालेल्या शिल्पा साळवी काही काळ रस्त्यावरच पडून होत्या.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. शिल्पा साळवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या अकाली निधनामुळे टाळसुरे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
शिल्पा साळवी यांच्या पश्चात सासरे आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.

