(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील ज्येष्ठ नागरिक, माजी बँक कर्मचारी आणि समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेले राजाराम लक्ष्मण साळुंखे यांचे ३१ मे २०२६ रोजी, त्यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्याच दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाफवली परिसरासह सरोदेवाडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राजाराम साळुंखे हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (आर.डी.सी.सी.) माजी कर्मचारी होते. सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते. श्री स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त होते. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
परिसरात ते प्रेमाने “काका” या नावाने परिचित होते.
स्वभावाने शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ असलेल्या काकांनी आपल्या अनुभवाच्या बळावर अनेकांना मार्गदर्शन केले. सरोदेवाडी आणि समाजाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. सर्वांना आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व आज कायमचे हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे समाजात निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजाराम साळुंखे यांना श्री विठ्ठल-रखुमाई प्रसादिक मंडळ, सरोदेवाडी यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक संस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

