(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
कोकणच्या लोककला परंपरेतील नमन या लोकप्रिय कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि हजरजबाबी संवादांनी रसिकांची मने जिंकणारे युवा नमन कलाकार विनायक सपकाळ (वय ३०, रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांचे निवे बुद्रुक येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने नमन कला क्षेत्रासह संपूर्ण कोकणातील रसिकवर्ग हळहळ व्यक्त करत आहे.
रविवारी (३१ मे) संगमेश्वर तालुक्यातील सायले येथे नमनाचा कार्यक्रम सादर करून परतत असताना निवे बुद्रुक परिसरात त्यांच्या वाहनाचा उभ्या डंपरला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मंगेश पाताडे (४५) आणि नंदिनी पाताडे (४०, रा. वांद्री, संगमेश्वर) हे दाम्पत्य जखमी झाले असून मंगेश यांच्या डोक्याला तर नंदिनी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. वाहन चालक चंद्रशेखर पांचाळ (५३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.
मुंबईहून खास कार्यक्रमासाठी आलेल्या विनायक यांनी सायले येथे नमनाचा रंगतदार कार्यक्रम सादर केला होता. प्रेक्षकांना मनमुराद हसवत, टाळ्यांचा कडकडाट मिळवत त्यांनी आपली कला सादर केली; मात्र कार्यक्रम संपवून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही तासांतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. रंगमंचावर हास्याची उधळण करणारा हा गुणी कलाकार एका क्षणात सर्वांना कायमचा सोडून गेला. नमनातील ‘मावशी’ ही भूमिका विनायक सपकाळ यांची ओळख बनली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, सहज अभिनय आणि खुमासदार संवादफेकीमुळे ते कोकणभर लोकप्रिय झाले होते. प्रत्येक नमनप्रेमी त्यांच्या रंगमंचावरील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असे. लोककलेबद्दलची त्यांची निष्ठा आणि भूमिकेशी असलेली एकरूपता प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून गेली. सायले येथील शेवटच्या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या “मावशीला गवळणी पोचवायलाच बसल्यात…” या संवादाची चर्चा रंगली होती. आज मात्र हेच शब्द अनेकांच्या काळजाला चटका लावणारे ठरत आहेत. रंगमंचावरून उच्चारलेला तो संवाद जणू नियतीचा संकेत ठरल्याची भावना रसिकांमधून व्यक्त होत आहे.
विनायक यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नमन कलाकार, लोककला प्रेमी, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला. कोकणच्या लोककलाविश्वासाठी झटणारा, आपल्या कलेने असंख्य चेहरे खुलवणारा एक उमदा कलाकार आज हरपला आहे. विनायक सपकाळ यांच्या रूपाने नमन कलेतील एक तेजस्वी तारा निखळला असून, त्यांनी साकारलेली ‘मावशी’ आणि त्यांचे रंगमंचावरील योगदान रसिकांच्या स्मरणात कायम अजरामर राहणार आहे.

