(पाचल / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल, रायपाटण भागाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत आहे. तालुका निर्मिती झाल्यास प्रशासकीय कार्यालयासाठी पाचल व रायपाटण या दोन्ही गावांमध्येही मोठी चढाओढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही गावांतील ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. जॅसमीन यांच्या उपस्थितीत २७ जानेवारी रोजी पाचल आणि रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल की रायपाटण याविषयीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अरबी समुद्रापासून सह्याद्रीच्या टोकापर्यंत विस्तार असलेला राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. राजापूर शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून यापासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटरच्या अंतरावर गावे वसलेली आहेत. त्यातच पूर्व परिसरात सह्याद्रीच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना शासकीय कामासाठी शहराच्या ठिकाणी येताना खूप गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राजापूर तालुक्याचे विभाजन करून पूर्व परिसराकरीता नवीन तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने रायपाटण व पाचलवासियांकडून करण्यात येत आहे.
पाचल व रायपाटण गावाने स्वतंत्र तालुक्याच्या मागणीकरीता मंत्रालयात प्रस्तावही सादर केला आहे. यापूर्वी झालेल्या अधिवेशनांमध्येही रायपाटण तालुका निर्मितीबाबत सत्ताधारी तसेच विरोधी गटातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मात्र प्रत्येकवेळी.आर्थिक अडचण पुढे करून शासनाने वेळ मारून नेली होती. त्यामुळे मधल्या काळात तालुका विभाजनाचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर २०१५ साली शासनाने २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
तालुक्याचे ठिकाण कुठे होणार?
दरम्यान पूर्व परिसरात पाचल व रायपाटण ही दोन मोठी गावे असून तालुक्याचे ठिकाण आपल्याच गावात व्हावे, याकरीता या दोन्ही गावांमध्ये चुरस आहे. या विभागातील महत्वाची शासकीय कार्यालये पाचल परिसरात असल्याने व याठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्याचे ठिकाण आपल्याच गावात व्हावे अशी पाचल वासियांची मागणी आहे. तर नवीन तालुका झाल्यानंतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी लागणारी आवश्यक जागा रायपाटण येथे आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यालय रायपाटण येथे व्हावे, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.
२७ रोजीच्या बैठकांची उत्सुकता वाढली
पाचल आणि रायपाटण यांच्या या वादात नव्या तालुक्याच्या निर्मितीचा प्रस्ताव धुळखात पडला होता. मात्र आता शासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल व रायपाटण ग्रामस्थांची मते घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार २७ जानेवारी रोजी पाचल व रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.