(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ परिसरात राज्य महामार्गालगत करण्यात आलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) आक्षेप घेत संबंधित व्यक्तीस नोटीस बजावली आहे. रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने हे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर उपविभाग कार्यालयाकडून २६ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, विठापेठ-मलकापूर-अणुस्कुरा-साटवली-पावस मार्गावरील रा.मा-१५० राज्य मार्ग क्रमांकावरील पाचल बाजारपेठ येथे रस्त्याच्या मध्यबिंदूपासून सुमारे ८.५० मीटर अंतरावर पत्राशेडचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र संबंधित बांधकामासाठी विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्य महामार्गालगत नवीन बांधकाम करताना नियमानुसार आवश्यक अंतर राखणे बंधनकारक आहे. संबंधित बांधकामामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे तसेच अपघाताचा धोका वाढल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी पाचल येथील नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने बाजारपेठेतील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी व अन्य प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे, अतिक्रमणामुळे आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यालगत मांडलेल्या साहित्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली होती.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित अतिक्रमण त्वरित हटविण्याचे आदेश दिले असून तसे न केल्यास नियमानुसार शासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. तसेच या अनधिकृत बांधकामामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असाल, अशी सूचनाही या पत्रातून देण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे पाचल बाजारपेठेतील वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

