(रत्नागिरी/ वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील नवलाईनगर परिसरात ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या एका वासराला नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप बाहेर काढले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे ही मोहीम वेगाने राबविण्यात आली. या यशस्वी बचावकार्यानंतर परिसरातून रेस्क्यू टीम आणि संबंधित सर्वांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवलाईनगर येथील खोत यांच्या मालकीच्या विहिरीत शनिवारी सायंकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास एक वासरू पडले होते. जवळपास अर्धा तास ते विहिरीत अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच प्रशांत साळुंखे यांनी तातडीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी अग्निशामक विभागाला पाचारण केले आणि अवघ्या काही मिनिटांत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
अंधाऱ्या विहिरीतील जीवावर उदार बचावमोहीम
सुमारे १० बाय १० आकाराची आणि ४० फूट खोल असलेल्या विहिरीत प्रचंड अंधार, वाढलेले गवत आणि ऑक्सिजनची कमतरता अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत रेस्क्यू टीमच्या एका कर्मचाऱ्याने कमरेला दोरखंड बांधून विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले.
यावेळी प्रशांत साळुंखे हे शाखाप्रमुख सिद्धेश्वर कोळी, सर्फराज शेख आणि राजू सुर्वे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहकार्य केले. कुणी प्रकाशाची व्यवस्था केली, कुणी दोरखंड उपलब्ध करून दिले, तर कुणी बचाव पथकासाठी आवश्यक मदत पुरवली. अखेर रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्याने कौशल्याने वासराच्या मानेला आणि पायाला दोरखंड बांधून त्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले.
माय-लेकराच्या भेटीने भावूक झाले उपस्थित
विहिरीतून बाहेर आल्यानंतर घाबरलेले वासरू थेट आपल्या आईकडे धावले. आपल्या पाडसाला सुखरूप पाहून गाईने त्याला मायेने चाटण्यास सुरुवात केली. माय-लेकराच्या या भावनिक मिलनाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
आपले वासरू सुरक्षित परत मिळाल्याचा आनंद खोत आजींना अश्रूंमधून व्यक्त झाला. त्यांनी प्रशांत साळुंखे, नगरपालिकेच्या रेस्क्यू टीम तसेच मदतीला धावून आलेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या धाडसी आणि संवेदनशील बचावकार्यानंतर नवलाईनगरसह संपूर्ण रत्नागिरी शहरातून नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमचे आणि प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

