(संगमेश्वर / वार्ताहर)
एसटी बसस्थानक म्हटलं की अनेकांच्या मनात गर्दी, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांचं चित्र उभं राहतं. मात्र संगमेश्वर बसस्थानकात रात्री घडलेला प्रसंग या समजुतींना छेद देणारा ठरला. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चक्क प्रवाशांसोबत बसून एसटीच्या उपहारगृहातील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
कोकण दौऱ्यावर असलेले मंत्री सरनाईक रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर येथील नव्याने उभारलेल्या आधुनिक बसस्थानकात दाखल झाले. संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या बसस्थानकात त्यांनी प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली.
यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि अन्य प्रवासी सुविधांची पाहणी केली. स्वच्छता, सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
पाहणीदरम्यान त्यांची पावले बसस्थानकातील एसटी उपहारगृहाकडे वळली. उपहारगृहात अनेक प्रवासी वडापाव, भजी, चहा आणि कॉफीचा आस्वाद घेत होते. वातावरणातील प्रसन्नता आणि पदार्थांचा दरवळता सुगंध पाहून मंत्रिमहोदयांनीही प्रवाशांमध्ये जाऊन स्थान घेतले. त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत बसून गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत संवाद साधला.
राज्याचे परिवहन मंत्री कोणताही बडेजाव न करता आपल्या शेजारी बसून गप्पा मारत वडापाव खात असल्याचे पाहून अनेक प्रवाशांना क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्याचबरोबर त्यांच्या साधेपणाने आणि आपुलकीच्या वागणुकीने उपस्थितांची मने जिंकली.
संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरला. स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेचा संदेश देणाऱ्या या भेटीमुळे लालपरीच्या सेवेत होत असलेल्या सकारात्मक बदलांची जिवंत अनुभूती प्रवाशांना मिळाली.

