(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हारेकरवाडी परिसरातून वन्यजीवप्रेमींना हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या बेकायदेशीर फासकीत अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून वनविभागाने अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तुरळवरून माखजनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खैराच्या झाडाला लोखंडी तारांची फासकी लावण्यात आली होती. या मार्गावरून जात असताना बिबट्याचा पाय फासकीत अडकला. सुटकेसाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले, मात्र या झटापटीत फास अधिकच घट्ट होत गेल्याने तो अधिकचा आणि झाडालाच लोंबकळत राहिला. अखेर श्वास गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. पोलीस पाटलांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे बिबट्याचा मृतदेह झाडाला लोंबकळलेल्या अवस्थेत आढळून आला. वन कर्मचाऱ्यांनी फासकीची लोखंडी तार कापून तसेच झाडाचा संबंधित भाग तोडून मृतदेह ताब्यात घेतला.
सुदैवाने, शिकाऱ्यांनी बिबट्याचे अवयव काढून नेण्याचा प्रयत्न केला नव्हता. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होऊ नये, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेहावर जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी वनपाल सागर गोसावी यांनी वन गुन्हे अन्वेषण रजिस्टरनुसार गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, परिमंडळ वनाधिकारी सागर गोसावी, वनरक्षक सुप्रिया काळे, सुरज तेली, सहयोग कराडे तसेच पंचांनी सहभाग घेतला. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई पार पडली.
वन्यजीवांची शिकार आणि जंगलात बेकायदेशीर सापळे लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. परिसरात संशयास्पद हालचाली अथवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ९०९६५७८७६१ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

