(जैतापूर / राजन लाड)
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मालवणी भाषेला सातासमुद्रापार पोहोचवणारे आणि ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर सुवर्णकाळ निर्माण करणारे ज्येष्ठ नाटककार कै. गंगाराम उर्फ नाना गवाणकर यांनी आपल्या साहित्यकृतींतून कोकणची संस्कृती घराघरांत पोहोचवली. मात्र, एवढे मोठे योगदान देऊनही या थोर रंगकर्मीचा अपेक्षित मान-सन्मान आणि गौरव झाला नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांनी व्यक्त केली. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष स्मृती सोहळ्यात ते बोलत होते.
नाना गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृहात ‘अशा या दोघी’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाट्यप्रयोगासोबतच उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी नानांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी रंगभूमीवरील जुन्या आठवणींना उजाळा देताना बाळ धुरी भावूक झाले. मालवणी बोलीला मुख्य प्रवाहातील रंगभूमीवर मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्यात नाना गवाणकर यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान साहित्यिकाची उपेक्षा होणे किंवा त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले जाणे, ही त्यांचे सहकारी आणि मित्र असलेल्या कलाकारांसाठी वेदनादायी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या स्मृती सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांच्यासह नानांचे स्नेही रवींद्र देवधर, ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुस्कर, सुनील परुळेकर, विलास चेउलकर, सुजाताताई शेलटकर, राजापूर येथील ॲडव्होकेट पराग मोदी, नानांचे निकटचे पत्रकार मित्र राजन लाड, नानांचे नातू धनंजय गवाणकर आणि नितेश गवाणकर उपस्थित होते. तसेच ‘अशा या दोघी’ नाटकातील सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, गवाणकरप्रेमी आणि मालवणी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
नाना गवाणकर यांच्या समृद्ध नाट्यप्रवासाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाला उजाळा दिला. या स्मृती सोहळ्यातून या महान साहित्यिकाप्रती आदर व्यक्त करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.


