(संगमेश्वर / एजाज पटेल)
नशा डोक्यात गेली की कोण काय करेल त्याचा नेम नसतो. त्याचा प्रत्यय संगमेश्वरात आला आहे. बेधुंद झालेला तळीराम टाटा टियागो चारचाकी घेऊन संगमेश्वरात आला. ना स्वतःला शुद्ध, ना गाडीचा कंट्रोल, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवली आणि वेळीच रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या संदर्भात रोहन गणेश शिर्के यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खुमासदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
महामार्ग कामामुळे संगमेश्वर सध्या चांगलेच चर्चेत आहे. अरुंद जागा तसेच महामार्ग चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी हा रोजचा विषय झालेला असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. महामार्ग अधिकारी किंवा ठेकेदार कंपनीचा कोणताही अधिकारी येथे देखरेखीसाठी नसल्याने सर्व बाबी पोलिसांवर टाकल्या जात आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी देखील अक्षरशः मेटाकुटिस आले आहेत. अशा परिस्थितीत पोलीस आपले कर्तव्य बजावत असतानाच रविवारी एक वेगळीच घटना घडली आणि चर्चेला उधाण आले.
रविवारी संध्याकाळी मुंबई गोवा महामार्गावर एक टाटा टियागो चारचाकी आडवी तिडवी धावत निघाली होती. कदाचित अपघात किंवा “हिट अँड रन” चा गंभीर प्रकार घडण्याची दाट शक्यता होती. महामार्गावर हा थरार पाहून बघणारे हवालदिल झाले होते. पुढे कुठेतरी, काहीतरी होणार अशीच चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत संगमेश्वर पोलिसांना ही माहिती मिळाली आणि मोठा अपघात होण्यापूर्वीच संगमेश्वर पोलीस अलर्ट झाले.
महामार्गावर फिल्डिंग लावून पोलीस तैनात असतानाच बेधुंद तळीरामची टियागो गाडी संगमेश्वर येथील सप्तालिंगी पुलावर दाखल झाली. पोलिसांनी वेळीच ओळखले आणि संशयित टाटा टियागो महामार्गांवर उपस्थित पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस हेडकॉन्स्टबेल क्रांती सावंत, वाहतूक पोलीस रियाज मुजावर यांनी वेळीच थांबवली.
रस्त्याच्याकडेला गाडी थांबवून पठयाला बाहेर घेतले तेव्हा मात्र पोलीस ही हैराण झाले. ड्रायव्हरसाहेब फुल टू फटॅक होते. ना बोलण्याची शुद्ध होती, ना उभे राहण्याची शुद्ध होती. पोलिसांच्या सर्वकाही लक्षात आले. महाशयांना असेच पुढे सोडले तर वेगळेच काहीतरी घडेल, याची काळजी घेत पोलिसांनी तातडीने पुढील पावले उचलली आणि टाटा टियागो ताब्यात घेत संबंधितांची चौकशी देखील केली. तोपर्यंत महामार्गवरील चारही बाजूला वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या सुमारे एक ते दीड की. मी पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.
या संदर्भात संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर रोहन गणेश शिर्के हे आपली टाटा टियागो ही चारचाकी घेऊन संगमेश्वरमध्ये येत असताना ते मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे व पुढील धोका लक्षात घेता त्यांना गाडीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संगमेश्वर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
संगमेश्वर पोलिसांनी तत्परतेने महामार्गांवर थांबून वेळीच ती गाडी थांबवली अन्यथा पुढे मोठा अनर्थ घडला असता. मात्र तो टाळण्यात पोलिसांना यश आले. तसेच वाहतूक कोंडी वेळीच सुरळीत होण्यासही पोलिसांची मदत झाल्याने संगमेश्वर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.