(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मासेमारीसाठी जाळे घेऊन समुद्रकिनारी गेलेले ६२ वर्षीय श्रीधर भिवा मुडे हे बेपत्ता झाल्याची घटना गावखडी येथे उघडकीस आली आहे. घरातून मासेमारीसाठी निघालेले श्रीधर मुडे अद्याप परतले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. त्यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर भिवा मुडे (वय ६२, रा. भंडारवाडी, गावखडी, ता. जि. रत्नागिरी) हे मासेमारीचे जाळे घेऊन गावखडी समुद्रकिनारी मासेमारीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते समुद्रकिनारी गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. बराच वेळ उलटूनही श्रीधर मुडे घरी न परतल्याने नातेवाइकांनी तसेच परिसरातील ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर त्यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांचे नातेवाईक सुनील कंपू मुडे (वय ३९, रा. भंडारवाडी, गावखडी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेलेले श्रीधर मुडे नेमके कुठे गेले, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


