( पुणे )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) व बारावी (HSC) जून-जुलै २०२५ पुरवणी परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र (Admit Card) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या परीक्षांचा प्रारंभ २४ जून २०२५ पासून होणार असून राज्यभरातील सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
-
इयत्ता बारावी लेखी परीक्षा:
२४ जून ते १६ जुलै २०२५ -
बारावी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान (ऑनलाइन परीक्षा):
१५ व १६ जुलै २०२५ -
इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन:
२४ जून ते ८ जुलै २०२५
या विद्यार्थ्यांना संधी
या पुरवणी परीक्षेद्वारे:
-
मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना,
-
ATKT (Allowed To Keep Term) असलेल्या विद्यार्थ्यांना,
-
श्रेणी सुधारणा (Grade Improvement) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना
दुसरी संधी मिळणार आहे.
पूर्वी ही परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जात असे. मात्र, यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा लवकर, म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यातच घेतली जाणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे?
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत किंवा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in) आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे पालन करूनच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण व छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार असून, सर्व परीक्षा शांतता व सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक व प्रवेशपत्रातील सर्व तपशील काळजीपूर्वक वाचून, नियोजित वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.