( चंदीगड )
दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यावेळी त्याला 40 दिवसांची पॅरोल रजा देण्यात आली असून 2017 मध्ये दोषी ठरल्यापासून तुरुंगाबाहेर येण्याची ही त्याची 15 वी वेळ ठरणार आहे. सध्या राम रहीम सिंह हरियाणातील रोहतक येथील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे.
याआधीही मिळाली होती 40 दिवसांची पॅरोल
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातही राम रहीम सिंह याला 40 दिवसांची पॅरोल मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा तितक्याच कालावधीसाठी पॅरोल देण्यात आली आहे. दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 2017 मध्ये त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पत्रकार हत्या प्रकरणातही दोषी
राम रहीम सिंह याच्यासह आणखी तिघांना एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी 2019 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. याशिवाय गेल्या काही वर्षांत त्याला वारंवार पॅरोल आणि फर्लो मंजूर करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये 21 दिवसांची फर्लो, जानेवारीत दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 30 दिवसांचा पॅरोल, तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी 20 दिवसांचा पॅरोल त्याला देण्यात आला होता. ऑगस्ट 2024 मध्येही त्याला 21 दिवसांची फर्लो मिळाली होती.
निवडणुकांआधी पॅरोलवर वाद
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन आठवडे आधी फेब्रुवारी 2022 मध्ये राम रहीम सिंह याला तीन आठवड्यांची फर्लो देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक वेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या सुट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह विविध शीख संघटनांनी राम रहीम सिंह याला वारंवार दिल्या जाणाऱ्या पॅरोल आणि फर्लोवर तीव्र टीका केली आहे. याआधी अनेक वेळा पॅरोलदरम्यान तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील डेराच्या आश्रमात वास्तव्यास होता.
सिरसा येथे मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे हरियाणा, पंजाब, राजस्थानसह इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. हरियाणातील सिरसा, फतेहाबाद, कुरुक्षेत्र, कैथल आणि हिसार या जिल्ह्यांमध्ये डेराचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

