(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व करिअरविषयक योजनांची माहिती घेण्यात आली. पुढील शिक्षणाची योग्य दिशा कशी निवडावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिक्षणाशी संबंधित कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्रांसाठी फोल्डर फाईल आणि वह्या देऊन गौरव करण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे, पूजा पवार, प्रज्ञा टाकळे, निधी निलेश आखाडे, तेजस पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

