(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी डाळाचा पऱ्या येथील विद्युत तारांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून वणवा भडकला आणि येथील आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांच्या बागेतील ७५ कलमांना या वणव्याचा जोरदार फटका बसला असून होरपळलेल्या कलमांमुळे सुमारे तीन लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बाबतचे वृत्त असे की दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास डालाचा पऱ्या येथील आंबा बागेतून मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याचा डोंब व प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्याने शेजारी असलेले उद्योजक प्रकाश पवार यांच्या बागेतील रखवालदार याने प्रमोदशेठ पवार यांना तातडीने मोबाइलद्वारे खबर दिली. त्यावर तितक्याच तत्परतेने उद्योजक युवक नेते प्रमोदशेठ पवार यांनी दोन हजार लिटर पाणी साठा असलेली पाण्याची टाकी व आपले बागेत तैनात करण्यात आलेले कामगारांचे पथक घेऊन बोलोरो गाडी घेऊन डालाचा पऱ्या येथील कलम बागेतील विद्युत तारांच्या घर्षनामुळे झालेल्या वनव्यातील प्रचंड पेठ घेतलेल्या आगीला विझवण्यासाठी मोठ्या परिश्रमाने प्रयत्न केले व काही तासातच ही आग विझवण्यात त्यांना यश आले.
परंतु या आगीमुळे आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांचे सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी प्रमोद पवार यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले नसते तर आजूबाजूचे अनेक बागायतदारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असते. एवढेच नव्हे तर हा वणवा सुंदरवाडी वस्तीनजीक पोहोचला असता व याचे गंभीर परिणाम मानवासहित गुराढोरांना भोगावे लागले असते.
सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी कळझोंडी गावच्या तलाठी श्रीमती स्नेहल लोंढे, सहकारी लिपिक दीपक वीर, गावचे सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाशजी पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार यांनी भेट देऊन पहाणी केली. या पहाणीमध्ये कळझोंडी आर. के मुळये ते कळझोंडी जिल्हा परिषद धरण येथे वीज वितरण कंपनीची विद्युत लाईन गेली असून या विद्युत लाईनवर व उभ्या असलेल्या विद्युत पोलवर आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या आलेल्या आहेत, त्यामुळे या परिसरात अनेक वेळा विद्युत तारांचे घर्षण होऊन या परिसरात अनेकदा अचानकपणे वणवे जाण्याच्या प्रकारामध्ये सातत्याने वाढ होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
या भागातील विद्युत लाईन कडे खंडाळा वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष घालून येथील विद्युत तारांचा होणारा विद्युत प्रवाह सुरळीत होण्यासाठी येथील झाडांच्या फांद्या झाडी झुडपी व पोलखाली असलेले पाळापाचोळा व गवत नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन या भागातील सुज्ञ नागरिकांनी केले आहे. तसेच दिपक पवार यांचे ऐन आंबा हंगामात झालेले नुकसान त्वरीत मिळावे अशी आग्रही मागणी दिपक पवार व गाववासिय नागरिकांनी केली आहे.