(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील वरद बलवंत नलावडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) 2024 च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यात 34 वा क्रमांक मिळवत त्याची कर सहाय्यक अधिकारी पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल पत्रकार प्रकाश चाळके आणि सौ. ज्योती प्रकाश चाळके यांनी देवरुख येथील त्याच्या निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देत त्याचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वरद नलावडे याने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश मिळवले असून, या यशाचे श्रेय त्याने आपल्या कुटुंबाला दिले. त्याचे वडील बलवंत नलावडे हे मीनाताई ठाकरे विद्यालयाचे प्राचार्य असून, आई व आजी यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्याने यावेळी नमूद केले.
वरदच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, परिसरात त्याच्या यशाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.

