( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जवळपास गेली दहा दशके संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेने शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे नवे नवे टप्पे यशस्वीपणे पार केले असून शिक्षण क्षेत्रात पैसा फंडने घेतलेली भरारी अभिनंदनीय आहे. ही संस्था आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. या संस्थेसाठी आवश्यक असणारे सर्वतोपरि सहकार्य आपण नक्की करू असे आश्वासन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी दिले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून रोहन बने हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण विभाग अध्यक्ष रोहित तांबे, संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्था पदाधिकाऱ्यांचा हस्ते शाल- श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना रोहित तांबे म्हणाले की, व्यापारी पैसा फंड संस्था आणि आपले गेली अनेक वर्षे स्नेहाचे ऋणानुबंध आहेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याच्या निमित्ताने आपण अनेकदा आलो आहोत. शाळा आणि संस्थेची प्रगती नक्कीच अभिनंदनीय आहे. संस्था आणि या शाळेसाठी आपला नेहमीच सहकार्याचा हात असेल, असे आश्वासन तांबे यांनी यावेळी दिले.
प्रमुख पाहुणे रोहन बने, रोहित तांबे आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी पैसा फंड कलादालनाची पाहणी केली. येथील कलाकृती पाहून त्यांनी कलाकारांचे कौतुक केले. आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उभारलेले कलादालन नेहमीच कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देईल, असा विश्वास रोहन बने आणि यावेळी व्यक्त केला.
( छाया : मिनार झगडे, संगमेश्वर
1) पैसा फंड कलादालनामध्ये कलाकृती पाहिल्यानंतर रोहन, बने रोहित तांबे आणि उपस्थित सर्व मान्यवर
2) पैसा फंडच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना रोहन बने व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य रमेश झगडे आणि मान्यवर

