( मुंबई )
मुंबईहून कोकणात समुद्री मार्गाने प्रवास करण्याचे स्वप्न अखेर साकार होत आहे. बहुप्रतीक्षित एम2एम (Mumbai to Mandwa/M2M) रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ 1 मार्च 2026 रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजता भाऊचा धक्का येथून निघालेली फेरी दुपारी 2 वाजता विजयदुर्ग जेटी येथे पोहोचणार असून हा आशियातील सर्वात जलद समुद्री प्रवास ठरणार आहे.
ही सेवा सुरू करण्याची औपचारिक घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असून 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बंदर विभागातील कार्यकाळात त्याची पायाभरणी करण्यात आली होती. 1 मार्च रोजी हा प्रकल्प औपचारिकरित्या सुरू होणार आहे.
रत्नागिरी आणि रायगड मार्गांवरही रो-रो सेवा
सिंधुदुर्गप्रमाणेच भविष्यात रत्नागिरी आणि रायगड मार्गांवरही रो-रो फेरी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री नितेश राणे यांनी दिले. सध्या मुंबई ते अलिबाग अशी रो-रो सेवा चालू असून ती आता विजयदुर्गपर्यंत वाढवली जाणार आहे. पुढील टप्प्यात इतर राज्यांनाही जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समुद्री सेवेच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. जलद प्रवासामुळे पर्यटकांची संख्या वाढेल तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला हातभार लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कोकणात जाणाऱ्यांसाठी अतिजलद पर्याय
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने रस्ते मार्गे कोकणात जाण्यास 10 ते 12 तास लागतात. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास 7 ते 8 तासांचा वेळ जातो आणि कोकण रेल्वे मार्गावर नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर रो-रो फेरी सेवा कोकणात जाणाऱ्यांसाठी एक अतिजलद, सुरक्षित आणि आरामदायी पर्याय ठरणार आहे.
मुंबई ते विजयदुर्ग अवघ्या सहा तासांत पूर्ण होणारा हा समुद्री प्रवास कोकणवासीयांसह पर्यटकांसाठीही दिलासादायक ठरणार असून, कोकणाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कसे असेल वेळापत्रक?
१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली फेरी सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल.
परतीची फेरी २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल.
मार्च महिन्यात एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत.
- मुंबई ते विजयदुर्ग: १, ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च
- विजयदुर्ग ते मुंबई: २, ५, ८, १२, १५, १९, २२, २६ मार्च
प्रारंभीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद आणि सेवेची कार्यक्षमता (ऑपरेशनल फिजिबिलिटी) तपासण्यासाठी हे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. प्रतिसाद समाधानकारक मिळाल्यास भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
तिकीट दर किती?
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचे प्रस्तावित दर पुढीलप्रमाणे :
- इकॉनॉमी: २,५०० रु.
- प्रीमियम इकॉनॉमी: ४,००० रु.
- दुचाकी: १,००० रु.
- सायकल: ६०० रु.
- चारचाकी: ६,००० रु.
ही फेरी प्रवाशांसह वाहनांची वाहतूक करणार असल्याने स्वतःची गाडी घेऊन कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. रस्त्याने १०-१२ तासांचा प्रवास करण्याऐवजी समुद्रमार्गे निसर्गरम्य आणि तुलनेने आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

