(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली घाटात आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. आरवली येथील प्रसिद्ध ‘पलट्या मारुती’ मंदिराजवळ भरधाव टाटा टेम्पोने प्रवासी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक आणि महिला प्रवासी गंभीर जखमी झाले असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली येथील रहिवासी रामदास विजय राणे हे एमएच ०३ डीसी ७८७० क्रमांकाची रिक्षा घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होते. दुपारी सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास आरवली घाटातील पलट्या मारुती मंदिराजवळ आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डीडी ०१ सी ९८२६ क्रमांकाच्या टाटा टेम्पोने त्यांच्या रिक्षाला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर रिक्षेचे मोठे नुकसान झाले. टेम्पोचालक संदीप कुमार यादव (वय ३७) हा वाहन निष्काळजीपणे आणि वेगात चालवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठी मदत केली. या अपघातात महिला प्रवासी रूपाली रामदास राणे आणि रिक्षाचालक रामदास राणे यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महामार्गावरील अपघातांचे सत्र कायम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात घडत आहेत. आरवली घाट, धामणी परिसर तसेच संगमेश्वरजवळील धोकादायक वळणांवर वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गाचे रखडलेले आणि अर्धवट काम, कंत्राटदारांचे ढिसाळ नियोजन, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि काही वाहनचालकांचा बेफाम वेग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

